२९.७.१३

नाटक परीचय : "येरे येरे पैसा"...

इंजिनीअरींगच्या दुसर्‍या वर्षाला असतांना, माझ्या कॉलेजने, "सीओईपी"ने सादर केलेल्या "समेवर टाळी" या एकांकीकेला २००७ साली फिरोदीया करंडक मिळाला होता. अर्थात, मी त्यात काहीही केलं नव्हतं. पण एक सच्चा सीओईपीअन् म्हणून, कॉलेज संपून चार वर्ष झाली तरीही, "ते जगलेले दिवस..." पुन्हा आठवले, की ताजंतवानं होऊन रोजच्या रहाटगाडग्याला जुंपून घ्यायची ताकद मिळते.

ह्या सगळयाची आठवण यावी असं एक व्यावसायीक नाटक, आज रात्री पाहीलं. औंधमध्ये नव्याने सुरू झालेल्या पंडीत भीमसेन जोशी नाट्यमंदीरात रविवारी २८ जुलै रोजी, रात्री ९.३० वाजता, संजय मोने लिखीत "येरे येरे पैसा" हे नवं डान्सिकल (हा त्यांचाच शब्द) आणि म्युजिकल नाटक सादर झालं. तेजस्वीनी पंडीत हिला रंगभूमीवर पहिल्यांदाच पहायला मिळणार म्हणून आणि घराच्या जवळच नाट्यगृह होतं म्हणूनही हे नाटक पहायचं होतं. तिच्या बरोबर नाटकात अभिजीत खांडकेकर, शेखर फडके आणि सायली मराठे यांच्या भुमिका आहेत. आणि संगीत निलेश मोहरीर यांचं आहे.

आपण जन्माला का आलो? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मग प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा शोध घेतो. शाळा, कॉलेज, प्रेम आणि लग्न, नोकरी, घर-दार, बंगला, गाडी, स्टेटस, मुलं आणि त्यांची शिक्षणं, रीटायर्ड झाल्यावर आपण कुणावर अवलंबून राहू नये म्हणून आणि केवळ म्हणूनच... आपण जवळपास सगळेच याच ठरावीक मार्गाने जाणारे प्रवासी, आणि ह्या प्रवासाला अगदी निर्धास्तपणे पार करता येण्याचं साधन म्हणजे पैसा... अनंत काळापासून पडलेल्या या प्रश्नाला उत्तर म्हणून बर्‍याच लोकांचं, कुठल्याही काळात जा, "आपण पैसा कमवण्यासाठी जन्माला आलोय" हे उत्तर नसेल, तर नवल!!!

मग तो पैसा किती कमवायचा? कुणासाठी कमवायचा? कमावलेल्या पैशाचा उपभोग कधी आणि कसा घ्यायचा? पैसा कसा मिळवायचा? त्याच्यासाठी किती खस्ता खायच्या? बरं, किती पैसा कमावला म्हणजे आपल्याला आयुष्य हवं तसं जगता येईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं कधीच कुठल्याच पैसे कमवणार्‍या माणसाने आधीच विचार करून ठेवलेली नसतात. मग त्याचे जसे चांगले परीणाम होतात, तसेच दुष्परीणामही होतात. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि हा विषय मी जन्माला आलो नव्हतो त्याआधीही अस्तित्वात होताच. मग या नाटकात नवीन असं काय? असा प्रश्न मी स्वतःला विचारला नाही. विषय जुनाच, पण नाटक कसं वेगळं होऊ शकतं हे "येरे येरे पैसा..."च्या सादरीकरणातून जाणवतं. जसा एखादा चित्रपट आपण वन टाईम वॉच म्हणतो, तसं हे नाटकही वन टाईम वॉच आहे...

नाटकात दोन सुत्रधार (शेखर आणि सायली) आहेत. ते नाटक शेवटापर्यंत नेतात. आणि मधल्या वेगवेगळ्या भुमिकाही अगदी सहज करतात. गोष्ट अभिजीत आणि तेजस्वीनीची आहे. कॉलेजमध्ये भेटतात आणि प्रेम जुळतं. पण तो बुजरा, ती बबली गर्ल. मग त्याने तिला घाबरत घुबरत विचारणं, तिलाही तो आवडतंच असतोच, पण मुलांनीच 'पहिलं पाऊल' टाकावं अशी अट, मग शेवटी होकार. आता आजच्या काळात संपर्काची साधनं म्हणजे मोबाईल, फेसबूक, लाईक, कमेंट आणि ऑनलाईन लाईन मारणं या सगळ्यावर कमेंट न केली तर नाटक आजच्या काळातलं आहे हे समजायला लहान मुलांना तरी वेळ लागतो आजकाल. असो. मग, ती दारू पिऊन घरी येते म्हणजे मॉडर्न मुलगी, तिची आई फार्मविलेवरून ७०० किलो बटाटे विकते म्हणजे टेक्नोसॅव्ही, आणि बाबा फेसबूकच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर कोटी करून खर्‍या शेतकर्‍यांच्या परिस्थितीवर भाष्य करतात (आयफोन, आयपॅड आणि 'आय पेड' फॉर इट वाली लाचारी). मग तो घरी येतो. बोलणी आणि पुढे रीतसर लग्न वगैरे लागतं आणि मुलगी सासरी जाते. संसार सुरू होतो. आणि मग इथून पुढे खरं या नाटकाचं नाव सार्थ ठरावं असं नाटक सुरू होतं.

ऑफिसमधली डिमांडींग (चालू/त्रासदायक/सेक्षुअली हरास सुद्धा करू शकणारी {हा बॉसचा प्रकार पुरूषाच्या नशीबी क्वचितच असेल...}) बॉस, कामाच्या डेडलाईन्स, वर्क प्रेशर, मग उशीरा घरी येणं, बायकोची तक्रार, मग मुलीच्या काळजीपोटी सासू-सासर्‍यांनी जावयाला समजावू पाहणं... फ्रस्ट्रेशन, ते विसरण्यासाठी दारू-पार्ट्या आणि त्या पार्ट्यांमध्येही त्याच समस्यांनी पछाडलेल्या लोकांची भेट... मग मध्यांतरापर्यंत या जोडप्याला त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या यासाठी ईश्वरी कृपेने १५ कोटी रूपयांची लॉटरी लागते. पुढे, ते युरोप ट्रीप करतात. मग उरलेल्या पैशाची गुंतवणूक करतात. मग तो स्वत:चा व्यवसाय सुरू करतो. आणि गुंतत गुंतत जातो. ती एकटी एकटी पडत जाते. पैसा पैसा करत तो बंगला, महाल, सोयी सुविधा, खरेदी करत जातो, आणि ती त्याच्याविना कंटाळून मग स्वतः काम करायला लागते... या नाटकाचा शेवट म्हणजे, तिचं काम करतांना, ती घसरून पडते आणि होणारं मूल दगावतं... पुढे काय होतं, नाटकाचा शेवट हा असाच शोकांत आहे की सुखांत की धक्कातंत्र... हे सगळं नाटक पाहून आपलं आपण ठरवायचं.

हे नाटक म्युजिकल आहे, त्यात गाणी, त्यांवर नाच. पण सुरूवातीचा अर्धा तास एकापाठोपाठ भडीमार होतो तेव्हाच फक्त थोडं नको वाटतं. पण नेपथ्य चांगलंय. व्हिजुअल प्रोजेक्शन्स आहेत, त्यामुळे नाटकातही टेक्नॉलॉजी वापरता येते हे दाखवण्यापुरतं वापरलंय. संवाद, अभिनय सर्वांचाच उत्तमच आहे. शेखर फडके विशेष वाटतो, त्याच्या या नाटकातल्या वैविध्यपूर्ण अभिनयामुळे. नाटकाचा दहावाच प्रयोग होता, त्यामुळे सगळेच कलाकार किमान एकदा तरी संवाद म्हणतांना अडखळले.

आता थोडीशी चीरफाड : आजकाल सर्वच क्षेत्रात कामाच्या वेळा अजिबात ठरलेल्या उरल्या नाहीयेत. खुद्द अभिनय क्षेत्रात रात्री ९.३० च्या प्रयोगासाठी, रोजच्या मालिकांच्या शूटींगसाठी, प्रवास आणि दौरे या सर्वांमुळे कलाकार मंडळींनाही पैशासाठी अहोरात्र काम करावेच लागते. त्यामुळे या नाटकातला नायक आयटी इंजिनीअरच का दाखवलाय, माहित नाही. बरं, आयटीबद्दल जुजबी माहिती वापरून नाटकाची थीम पोचवण्याचा प्रयत्न अपूरा आहे. म्हणजे, आयटी किंवा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स केवळ माहिती गोळा करण्याचं आणि ती पुरवण्याचं काम करतात असा समज आहे. खूप त्रोटक विचार आणि अभ्यास. नायक, बीई कंप्यूटर आणि नायिका आर्किटेक्ट. मग ती कुठल्या कॉलेजमध्ये एकत्र शिकतात? (अकरावी-बारावी सायन्स मान्य... नाटक-स्वातंत्र्य असं नाव देऊया...) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सुत्रधार सांगतात की आता दोघेही आपापल्या कामांमध्ये इतके बिजी झालेत की ते दोघेही एकमेकांना व्हिडिओ चॅटद्वारे भेटतात, बोलतात... तर मग लगेच, त्याच क्षणाला नायिकेला ओकारी येऊन ती आई होणारे असं डिक्लेअर करतात... (किडा वळवळलाच...)

'समेवर टाळी' ह्या एकांकीकेत पैसा ही थीम नव्हती, तर मन आणि बुद्धी यांतलं द्वंद्व ही होती... पण काही काळापुरतं तरी मला आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटला की त्यांनी कितीतरी आधीच या विषयावर एक कलाकृती निर्माण करून 'फिरोदीया' करंडक जिंकला होता. समेवर टाळी

नाटक पहाणं, ही आवड असते. ती असली, की कुठलंही नाटक पहाणेबलच असतं. त्यामुळे आवडवाले लोकहो, पहा एकदा.

हर्षल (२९/७/१३ - स. ३. ३०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा